हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी रस्त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज वाहनचालकांसह स्थानिक नागरिक त्रस्त, मागील दोन महिन्यात चार मोठे अपघात, प्रशासन मात्र मुग गिळून गप्प अशा मथळ्याबाबत बातमी दिली होती. या बातमीच्या दणक्याने उरुळी कांचन – जेजुरी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
उरुळी कांचन – जेजुरी राज्य मार्गावर शिंदवणे घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व वाहून गेलेल्या साईडपट्टयामुळे आणखीच भर पडली आहे. अडीच किलोमीटर अंतराच्या घाट रस्त्यात घाट उतरताना सुरुवातीला माळाचे वळण या दोन्ही ठिकाणी मोठी अपघाती वळणे आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधीं लक्ष देत नसल्याचे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक यांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोष होता. मात्र, अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा तात्पुरती डागडुजी करून कायमस्वरूपी उपाययोजनेकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता.
शिंदवणे हा घाट हवेली व पुरंदर, दौंड या तीन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा घाट आहे. उरुळी कांचन ते जेजुरी हा ३० किलोमीटर अंतराची अवस्था पाहून वापर झालेल्या निधीबाबत शंका निर्माण होत असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले होते. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व पसरलेल्या खडीमुळे घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. जेजुरीवरून सोलापूर रस्त्यावर येणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटाकडे पाहिले जाते. मात्र, या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडय़ाचा अभाव यामुळे शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, अपघात झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
पुरंदर तालुक्यातील उत्तर बाजूच्या अनेक गावातून उरुळी कांचन व हडपसर येथे दररोज ये- जा करणाऱ्या नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घाटात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी कस्तुरी ग्रुपच्या वतीनेहि करण्यात आली होती. ही मागणी प्रशासनाने मान्य करून घाटात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावून कस्तुरी प्रतिष्ठानची मागणी पूर्ण केली त्याबद्दल शासनाचे कस्तुरी ग्रुपच्या वतीने मिलिंद मेमाणे यांनीही आभार मानले आहेत.