मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असतानाच बदलापूर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे.बिहारमधून उपचारासाठी मुंबईत आलेल्या तेरा वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर एका 27 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्वस पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील एका १३ वर्षीय मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी मुंबईला येण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला. हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या सुरज सिंग या नराधमानं तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये आणत एक घर भाड्याने घेऊन दिलं. या घरी त्याचं कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं नियमित येणं-जाणं होतं. याच दरम्यान संधी साधत त्यानं तीन ते चार वेळा या कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. ही बाब तिच्यावर सुरू असलेल्या उपचारात उघड झाली. मात्र या गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दोन वेळा खोटी माहिती सांगितली. याप्रकरणी मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पॉकसो कायद्यांतर्गत झिरो नंबरचा एफआयआर दाखल होऊन तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रान्सफर झाला.
आरोपीला वाचवण्यासाठी पिडीतिने व कुटुंबीयांनी केलेला बनाव सहाय्य पोलीस आयुक्त शैलेश काळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गजल यांनी ओळखला. त्यानंतर पिडीतेच्या कुटुंबाची कसून चौकशी केल्यानंतर अखेर सत्य समोर आलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नराधम आरोपी सुरज सिंग याला बिहार मधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे