अक्षय टेमगिरे
शिरूर : करडे( ता. शिरूर) येथे जमिनीच्या व्यवहारातील पैसे न दिल्याच्या रागातून एकावर पिस्तूल रोखून थांब तुला गोळ्या घालतो पैसे द्यायला लय दिवस थांबवलं असे म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश दत्तात्रय रोडे(वय-४१वर्षे, रा.करडे, ता.शिरूर,जि.पुणे)यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,करडे(ता.शिरूर)येथे शनिवार (दि.१२)सकाळी दहा वाजता महेश रोडे स्वतःच्या घरासमोर उभे होते.त्यावेळी दिपक नवले याने जमिनीच्या व्यवहाराचे महेश रोडे यांच्याकडे राहीलेले ५०हजार रुपये दिले नसल्याच्या कारणावरून रोडे यांच्यावर पिस्तुल रोखले व थांब तुला गोळ्या घालतो आणि मारूनच टाकतो असे म्हणून पैशाला खूप दिवस रखडवले आहे.असे बोलून नवले याने त्याच्या हातातील पिस्तुल मागे-पुढे ओढून महेश रोडे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलचा खटका ओढला .त्यावेळी महेश रोडे यांनी दीपक नवले याचा हात बाजूला ढकलला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबतच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहे.