नगर : संगमनेर येथे धुनी – भांडी करणाऱ्या महिलेची मुलगी कल्याणी मोहन अहिरे हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वन अधिकारी बनली आहे. कल्याणीने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
संगमनेर शहरातील अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर असणाऱ्या संजय गांधी नगर या परिसरात संगीता मोहन अहिरे ही कल्याणी व नवनाथ या आपल्या दोन मुलांसह छोट्याशा घरात राहत आहे. दोन्ही मुले लहान पणापासून हुशार होती. या दोन्ही मुलांचे संगीताने दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करून शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी आपल्या आईचे होणाऱ्या हाल लक्षात घेता कल्याणी जिद्दीला पेटली. आणि तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉले जमध्ये सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले
कल्याणी अहिरे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या पाहून आपणही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली तर नक्कीच प्रशासकीय अधिकारी बनू अशी मनाशी खुणगाट बांधत संगमनेरच्या कल्याणीने एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली. अन पहिल्या प्रयत्नातच तिने यश मिळवत ती थेट सहाय्यक अभियंता श्रेणी १ या पदावर जाऊन पोहोचली आहे.
दरम्यान, घरी कायम अठरा विश्व दारिद्र्य होते, त्यात आई दुसऱ्याच्या घरी धुणं भांडीचे काम करत असल्यामुळे पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणे आणि शिक्षण घेणे परवडणारे नसल्यामुळे कल्याणीने घरीच राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तिने सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली. या परीक्षेचा निकाल कानी पडताच तिच्याआईला व तिच्या भावाला आनंद गगनात मावेनासा झाला आहे.