Alandi News : आळंदी, (पुणे) : संतसाहित्याचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं ‘वार्षिक रिंगण’ तीन वर्षांपासून आळंदी येथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत आहे. केवळ संतविचारांवर वाहिलेली ही पहिली वक्तृत्व स्पर्धा यंदा श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाठिंब्याने होत आहे.
यंदा रविवार १७ डिसेंबर रोजी आळंदी – डुडूळगाव येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये ही स्पर्धा होईल.
‘भक्ती तीच जी धर्माची कुंपणं उद्ध्वस्त करते!’, ‘अवघा रंग एक व्हावा’, ‘संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही’, ‘बंडखोर शिष्य : संत परिसा भागवत’, ‘जातिभेदाच्या आजारावर संतविचारांचं प्रिस्क्रिप्शन’ असे ५ विषय आहेत. यापैकी कुणीतरी एका विषयावर ५ मिनिटांची वेळमर्यादा आहे. १५ ते ३० वयोगटासाठी ही स्पर्धा खुली आहे.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. पहिल्या क्रमांकासाठी ११ हजार रुपये, दुसऱ्यासाठी ९ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी ७ हजार अशी एकूण ४१ हजार रुपयांची ८ बक्षिसं आहेत. आळंदी येथील संतसाहित्याचे अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तर ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ आणि श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे प्रमुख विशाल तांबे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – वैभव गमे ७७९६४७५९६९, प्रविण शिंदे – ८४४६६९५४३४, स्वामीराज भिसे – ९६५७०७३३३३