पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडतील अशा चर्चांना गेल्या अनेक महिन्यापासून उधाण आल आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसंतदादा शुगर फॅक्टरी मध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीवर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता त्यापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा सुरु झाली. त्यामुळे पुन्हा एकदा या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.