गणेश सुळ
केडगाव, (पुणे) : बळीराजाला सगळेच दिवस सारखे नसतात. पाऊस नाही तर पिक नाही, पाऊस आहे तर पिकाला बाजारभाव नाही, बाजारभाव असेल तर पिकाच उत्पन्न नाही. एक ना अनेक समस्यांचे जाळे शेती व्यवसायात पहावयास मिळते.
दौंड तालुक्यात बाजरीचे पावसाअभावी अगदी कमी प्रमाणात बाजरी पेरणी झाली होती. काही प्रमाणात पावसाने ओढ दिल्याने बाजरी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी बाजरीचे पिके जळाल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा होती त्या शेतकऱ्यांनी वेळेवर पाणी दिल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. सध्या पिकांची काढणी सुरू झाली आहे. परंतु एकंदरीत पावसाचा झालेल्या परिणामामुळे बाजरीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
निसर्गाच्या लहरीपणात शेतीव्यवसायाचा खेळ खंडोबा झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे बळीराजा संतापलेल्या स्थितीत असून वर्षभर अन्नधान्याची शिदोरी देखील धोक्यात असल्याचे पहावयास मिळत आहे. या वर्षी दौंड तालुक्यात पाऊसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. जून, जुलै महिण्यात पाऊसाने हजेरी लावली नाही.
थोडी फार रिमझीम पावसाने झालेली ओल शेतकऱ्यांनी बाजरी पेरणी साठी योग्य माणून बाजरीची पेरणी केली. मध्यतंरी झालेल्या पावसाने या पिकाला बहर दिला. त्यातून बाजरीचे पिक शेतावर डोलू लागले. शेतकरी पुन्हा भलरी गिते गाऊ लागले. त्यातून शेतावर आलेल्या पक्षांना माघारी फिरविण्याचे काम शेतकरी वर्गाला करावे लागले. काही ठिकाणी इर्जिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. परंतु तब्बल दहा पंधरा दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने बाजरी उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. काढणी झालेली बाजरीची कणसे पावसात भिजत आहे. अगोदरच योग्य वाढ झाली नसल्याने बाजरी उत्पन्नाचा उतारा देखील कमी प्रमाणात आहे.
थोड्याशा पाऊसात बाजरीचे पिक जोमाने वाढल्याने सध्या स्थितीला ते पीक काढणीस आले असून काही ठिकाणी बाजरीची मळणी करण्याचे काम सुरू आहे. दौड तालुक्यात बाजरीची काढणी सुरू झाली असून अनेक भागात या काढणीला वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी मळणी सुरू केली आहे. सध्या पावसाने बाजरी पिकाचे नुकसान होऊ नये. त्यामुळे बोरिबेल, खडकी, मलठण, जिरेगाव, देवळगाव राजे, रावणगाव अशा विविध ठिकाणी बाजरी पिकांच्या काढणीला वेग आला आहे. परंतु मजुरांची टंचाई असल्याने अनेक ठिकाणी मजुरांना अधिक रोजंदारी देऊन बाजरीची काढणी केली जात आहे.
दरम्यान, बाजरीची कणसे कापल्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतातच हे पिक पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे या पिकाला पावसाचे पाणी लागून उत्पादन कमी होणार आहे. जास्त काळ या पिकाला पाऊसाचे पाणी लागले तर कणसाला मोड येण्याची शक्यता आहे. सध्या पर्जन्यमान असेच राहिले तर हाता तोंडाशी आलेला बाजरीचा घास हिरावला जाईल. त्यातून शेतकरी अजून आर्थीक विवंचनेत जाईल. यामुळे प्रशासनाकडून काहीतरी उपाययोजना केल्या जाव्यात. असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे.