उरुळी कांचन : जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या हवेलीतील एका नामांकित व्यावसायिकावर रात्रीच्या वेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना शिरसवाडी (गावाडेवाडी) (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. 05) संध्याकाळी ही घटना घडली. या हल्यात व्यावसायिकाला गोळी लागली असून त्यांच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेत हल्लेखोरांनी त्याच्या अंगावरील तब्बल 30 ते 32 लाखाहून अधिक रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे हवेलीसह पुणे जिल्यात एकच खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संतोष गावंडे (वय -अंदाजे 44, पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, रा. शिरसवाडी (गावाडेवाडी, रा. हवेली) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गावंडे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा (रियल इस्टेट) व डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. बुधवारी सायंकाळी ते आपल्या मर्सिडीज कारमधून घराच्या दिशेने निघाले होते. शिरसवाडी परिसरात आले असता, रस्त्यावर एका तरुणाने आपली दुचाकी बंद पडल्याचे भासवून किक मारण्याचे नाटक सुरू केले होते.

दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असल्याने गावडे यांनी आपली मर्सिडीज कार थांबवली. कार थांबताच, दबा धरून बसलेल्या आणि पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी थेट कारच्या खिडकीच्या काचेवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेली गोळी मर्सिडीजची काच फोडून थेट संतोष गावंडे यांच्या गालात घुसली.
हल्लेखोरांनी अंगावरील 20 ते 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि जवळील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी संतोष गावंडे यांना तातडीने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
दरोड्याचा की पूर्ववैमनस्याचा डाव?
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची कसून पाहणी केली. केवळ लुटमारीच्या उद्देशाने हा दरोडा टाकला होता की यामागे काही पूर्ववैमनस्य किंवा जमिनीच्या व्यवहारातून झालेला वाद आहे, या दोन्ही कोनातून पोलीस तपास करत आहेत







