बारामती: बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोरगाव-आंबी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे उघड्यावर टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि खळबळ पसरली आहे. याबाबत बुधवारी रात्री उशिरा सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेकून दिलेल्या साठ्यात एका कंपनीच्या लिक्विड सिरपच्या सुमारे साठ बॉक्समध्ये जवळपास तीन हजार बाटल्या, तसेच दुसऱ्या एका कंपनीच्या कॅप्सूलच्या अंदाजे सहा हजार गोळ्यांचा समावेश होता. या एकूण साठ्याची किंमत सुमारे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुदतबाह्य औषधे योग्य पद्धतीने नष्ट न करता सार्वजनिक जागी टाकल्याच्या आरोपाखाली संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मूळचे मोरगावचे रहिवासी असलेल्या आणि सध्या पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही औषधे उघड्यावर पडलेली पाहून काही स्थानिक ग्रामस्थांनी ती उचलून घरी नेल्याचेही समजते, त्यामुळे लहान मुले, नागरिक किंवा जनावरे यांच्या संपर्कात ही औषधे आल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

बारामतीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले असून, शासकीय दवाखान्यांमध्ये औषधसाठ्याची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवली जाते, तर खासगी दवाखान्यांतील मुदतबाह्य औषधे बायोमेडिकल वेस्टमार्फत नष्ट करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवले, मात्र त्या विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर पोलिसांनीच तेथे खड्डा खोदून हा साठा नष्ट केला. या घटनेमुळे मुदतबाह्य औषधांच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.







