पिंपरी : प्रेयसीसोबत झालेल्या किरकोळ वादातून मद्यधुंद प्रियकराने थेट 100 फूट उंच मोबाईल टॉवर गाठल्याचा धक्कादायक प्रकार मामुर्डी येथे घडला. प्रेयसीने लग्नाला होकार द्यावा, या मागणीसाठी टॉवरवर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर प्रेयसीच्या हातात हार देऊन लग्नाला होकार देण्यास सांगितल्यानंतर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. तब्बल पावणेचार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या क्रेनच्या सहाय्याने त्याला सुखरूप खाली उतरवण्यात आले. रविवारी (ता. 02) हा प्रकार घडला.

संबंधित 22 वर्षीय तरुण मूळचा आसामचा असून, त्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणाने मद्यधुंद अवस्थेत मामुर्डी येथील लोखंडी मोबाईल टॉवर गाठला. दुपारी साडेतीनच्या सुमारास तो टॉवरवर चढला आणि सुमारे 100 फूट उंचीवर जाऊन बसला.
तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देहूरोड पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली.

तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी त्याची प्रेयसी, गावाकडील नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची मदत घेतली. मोबाइल फोनवरून त्याच्याशी सातत्याने संवाद साधत समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांची चिंता वाढली.
अखेर पोलिसांनी प्रेयसीच्या माध्यमातून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीच्या हातात हार देऊन तिने लग्नाला होकार द्यावा, असे सांगण्यात आले. त्यानंतर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. अग्निशमन दलाच्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.







