पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि मुंबईदरम्यान दोन अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मिरज, सांगलीसह मार्गावरील १५ प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि परिसरातील अनुयायांना मुंबईला जाणे सोयीचे होणार आहे.

गाडी क्रमांक ०१४०२ कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूरहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर विशेष गाडी ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

कोल्हापूर आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या या दोन्ही विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले या १५ स्थानकांवर थांबे असतील.
या विशेष गाड्यांना एकूण १८ डबे जोडण्यात आले आहेत. त्यामध्ये द्वितीय शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी, चेअर कार आणि गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
या विशेष गाड्यांमधील अनारक्षित डब्यांची तिकिटे सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध असतील. तसेच रेल्वेच्या ॲपवरूनही प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, मिरज आणि आसपासच्या भागातील अनुयायांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.






