राहुलकुमार अवचट

यवत: एल-निनोमुळे येणाऱ्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुळशी धरणातील पाणी पहिल्या टप्प्यात पंपिंगद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली असून दुसऱ्या टप्प्यात बोगदा तयार करून हे पाणी मुळा-मुठा व भीमा नदीत सोडावे, अशीही मागणी केली. समितीने मंगळवारी (दि. 24) आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत मुळशी धरण प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर टाटा पॉवरच्या भिरा जलविद्युत केंद्राच्या अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक घेतली.
यावेळी समितीचे सदस्य आमदार भिमराव तापकीर, आमदार निलेश राणे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार रईस शेख, आमदार हेमंत ओगले ,आमदार अशोक पाटील यांसह महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग आणि टाटा पॉवरचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

मुळा नदीवर टाटांनी १९२७ मध्ये बांधलेले मुळशी धरण गेली जवळपास शंभर वर्षे राज्याच्या वीजनिर्मितीत मोलाची भूमिका बजावत आहे. या धरणाचे पाणी सह्याद्री ओलांडून पश्चिमेकडे रायगड जिल्ह्यातील भिरा वीजगृहात नेऊन त्यावर वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी समुद्राकडे वाहून जाते. दुसरीकडे पुणे शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक भागांची गरज आणि दौंड, हवेली, इंदापूरसह उजनी व सोलापूर भागात पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे मुळशीच्या पाण्याचा काही वाटा पूर्वेकडे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळावा, अशी मागणी समितीने केली. पाहणीदरम्यान समितीने धरणाची संरचना, सांडवा, पाणी सोडण्याची व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्ष पाहिली. धरणातील सध्याचा पाणीसाठा, मृतसाठा, देखभाल आणि सुरक्षेची माहितीही अधिकाऱ्यांकडून घेतली.
बैठकीत टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांचे सादरीकरण केले. टाटा पॉवरची तीन जलविद्युत केंद्रे आहेत. त्यांची एकूण क्षमता 447 मेगावॅट आहे. या केंद्रांमधील संपूर्ण वीज मुंबईला पुरवली जाते. पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात वीजनिर्मिती सुरू करण्याची क्षमता आणि ब्लॅक स्टार्ट सुविधा यांमुळे ही केंद्रे मुंबईच्या वीज ग्रीडसाठी महत्त्वाची मानली जातात.
कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार टाटा पॉवरला वीजनिर्मितीसाठी किती पाणी वापरण्याची अनुमती आहे आणि मागील पाच वर्षांत प्रत्यक्ष किती पाणी वापरले गेले यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. धरणातील मृतसाठा आणि धरणातून पूर्वेकडे पाणी सोडण्याच्या सध्याच्या 100 क्युसेकच्या मर्यादेचाही आढावा घेण्यात आला. टाटा पॉवरने आपली भविष्यातील क्षमता वाढ अतिरिक्त पाणी न वापरता पंप स्टोरेज प्रकल्पांद्वारे करण्याचे नियोजन केले आहे, याचीही नोंद समितीने घेतली.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात मुळशी धरणातील पाणी पंपिंगद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समितीने केली. विशेषतः दुष्काळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यावर भर देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात कायमस्वरूपी उपाय म्हणून बोगदा तयार करून हे पाणी मुळा-मुठा व भीमा नदीत सोडावे, अशीही मागणी करण्यात आली असून यासाठी टाटा संस्थेने सहकार्य करावे, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली.
मुळशीचे पाणी पूर्वेकडे वळवा! दौंड, हवेली, इंदापूर, उजनी व सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार राहुल कुल यांची ठाम मागणी
मुळशीचे पाणी पूर्वेकडे वळवताना महाराष्ट्र कोणतेही नवीन पाणी मागत नाही, हे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले. हे पाणी कृष्णा लवादाने महाराष्ट्राला दिलेल्या वाट्यातच मोजले जाईल. फक्त त्याच्या वापराचे ठिकाण बदलेल. आज समुद्राकडे जाणारे पाणी आपल्याच खोऱ्यातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल.
वीजही हवी आणि शेतकऱ्यांना पाणीही हवे – आमदार राहुल कुल
“मुळशी धरणातून निर्माण होणारी वीज मुंबईला जाते आणि त्यानंतर हे पाणी समुद्रात वाहून जाते. दुसरीकडे दौंड, हवेली, इंदापूरसह सोलापूरपर्यंतचा शेतकरी आणि नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतो. एल-निनोमुळे येत्या काळात हे संकट अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे आधी पंपिंग आणि नंतर बोगदा या मार्गाने मुळशीचे पाणी पूर्वेकडे आणणे ही काळाची गरज आहे. वीजनिर्मितीही सुरू राहावी आणि शेतकऱ्यांना हक्काचे पाणीही मिळावे, असा समतोल साधण्यासाठी समिती शासन आणि टाटा पॉवरकडे सातत्याने पाठपुरावा करेल,” असे समितीप्रमुख आमदार ॲड. राहुल कुल यांनी सांगितले.






