लोणी काळभोर, ता. 25 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी मैदानाच्या पूर्व बाजूला ओढ्यालगत लिंबाच्या झाडाखाली चिलीममध्ये गांजा भरून ओढणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पकडले.

माणिक बाबू थोरात (वय 58, रा. समतानगर, कदमवाकवस्ती) आणि राहुल रमेश दोडके (वय 37, रा. इंदिरानगर, पालखी स्थळाजवळ, कदमवाकवस्ती) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक कदमवाकवस्ती परिसरात गस्त घालत होते. यावेळी अमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखेचे पथकही त्यांच्यासोबत कारवाईसाठी सहभागी झाले होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पालखी मैदानाच्या पूर्व बाजूला ओढ्याजवळील लिंबाच्या झाडाखाली दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्या. त्यांच्या जवळ धूर दिसल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दोघेही काळ्या रंगाच्या चिलमीत काहीतरी भरून ओढत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चिलमीत गांजा भरून ओढत असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर चिलीम, कापसाची बोळा आणि जळालेल्या माचिसच्या काड्या आढळल्या. संबंधित साहित्य पोलिसांनी जागीच नष्ट केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) व 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.






