पुणे, ता. 25 : पुण्यातील केजे कॅम्पसमधील ट्रिनिटी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टिम लावलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्यासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट पाहत बसस्टॉपवर उभ्या असलेल्या सहा विद्यार्थ्यांना अचानक ट्रकने धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातामुळे ट्रिनिटी कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. या अपघात नेमका कसा घडला, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले की अन्य काही कारण होते, याचा तपास कोंढवा पोलीस करत आहेत.







