कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील चार शासन नियुक्त संचालक आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. शासन नियुक्त चार संचालकांसह महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावून न्यायालयात आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अध्यक्ष निवडीच्या सभेचे प्रोसीडिंग सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सर्व संचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. यावर समविचारी आघाडीचे वकील अॅड. आशुतोष कुंभकोनी यांनी आतापर्यंत महायुतीच्या आठ संचालकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यानंतर महायुतीच्या उर्वरित सर्व संचालकांनाही विविध माध्यमांतून नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
संबंधित संचालकांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले नाही, तर पुढील सुनावणीवेळी आदेश काढण्यात येतील, असा इशाराही न्यायालयाने दिला. अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या सभेचे तसेच चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीनंतर झालेल्या सभेचे प्रोसीडिंग सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली. समविचारी आघाडीकडून अॅड. श्रीकृष्ण गनबावले आणि अॅड. आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडली, तर महायुतीकडून अॅड. साखरे यांनी युक्तिवाद केला.
गोकुळ दूध संघाची दुसरी सभा १० नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या सभेत राज्य सरकारकडून चार शासन नियुक्त संचालकांची निवड करण्यात आली आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. समविचारी आघाडीकडे बहुमत असूनही त्यांना अध्यक्षपद मिळू शकले नाही.
सभेच्या गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता होती. महायुतीकडे १२ संचालक होते. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्यानंतर १० नोव्हेंबरच्या सभेत महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
राज्य सरकारच्या चार शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिले आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आता ३ डिसेंबरच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे गोकुळमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






