पुणे : रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक वळणे, अस्पष्ट वाहतूक चिन्हे आणि संरक्षक कठड्यांचा अभाव यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या महामार्गावरील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी आता कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एआयच्या माध्यमातून रस्त्यांची स्थिती, अपघातप्रवण ठिकाणे आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. यासाठी परिवहन विभागाने १८ लाख ४० हजार ८०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने महामार्गाच्या स्थितीचे सखोल मूल्यमापन केले जाईल. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे, खराब रस्ते, धोकादायक वळणे, वाहतूक चिन्हांची स्थिती, संरक्षक कठडे आणि इतर सुरक्षा सुविधांमधील त्रुटींचा शोध घेतला जाणार आहे.
या सर्वेक्षणात केवळ त्रुटींची नोंद केली जाणार नाही, तर त्या नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत, याचे भौगोलिक स्थानही निश्चित केले जाईल. त्यामुळे संबंधित यंत्रणांना दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ठिकाणे निश्चित करणे सोपे होणार आहे.

अपघातप्रवण क्षेत्रांची अचूक माहिती मिळवण्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर केला जाणार आहे. त्याद्वारे महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर रस्ता सुरक्षेतील त्रुटी, अपघातांचा संभाव्य धोका आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यांचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.
या अहवालामुळे रस्त्यांवरील कोणत्या ठिकाणी तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, हे संबंधित यंत्रणांना समजू शकेल. परिणामी, अपघातांचा धोका कमी करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
एआय आधारित रस्ता सुरक्षा सर्वेक्षणाच्या संकल्पनात्मक चाचणीसाठी (पीओसी) परिवहन विभागाने खर्चाला मंजुरी दिली आहे. यासाठी १५ लाख ६० हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर १८ टक्के जीएसटीचे २ लाख ८० हजार ८०० रुपये आकारले जाणार आहेत. अशा प्रकारे सर्वेक्षणासाठी एकूण १८ लाख ४० हजार ८०० रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञान आणि जिओ टॅगिंगच्या मदतीने महामार्गावरील धोकादायक ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.






