खेड : मांजरेवाडी धर्म (ता खेड) गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर तिचा निघृणपणे खून केल्याप्रकरणी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता अज्ञातांनी नराधम आरोपीच्या घरासमोरचा ट्रॅक्टर पेटवला असून घरालाही आग लावली आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म) येथील अल्पवयीन १७ वर्षाच्या मुलीला आरोपी नवनाथ कैलास मांजरे (वय-२९ रा मांजरेवाडी धर्म, ता-खेड) याने गाडीवर बसवुन शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यात टाकला. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. दरम्यान या संताजनक घटनेनंतर शुक्रवार (दि १८) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला. घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली. यावेळी पोलिसांसह अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे.