उरुळी कांचन : सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून आईने रागवल्यानंतर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पद रीतीने बेपत्ता झाली आहे. संशयित आरोपी गणेश डोईफोडे या तरुणाने अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुलीला कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 08) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची 16 वर्षीय मुलगी या घरात टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी मुलगी आईचा मोबाईल सतत वापरत असल्याने व खूप वेळ मोबाईल वापरत असल्याने आईने तिला रागावून हाताने एक चापट मारली. त्यानंतर आईने मोबाईलची तपासणी केली असता, सदरची मुलगी ही गणेश डोईफोडे (पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्याशी मोबाईलवर मेसेजद्वारे संपर्क साधत असल्याचे उघडकीस आले.

या घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास “मी बाहेर जाऊन येते” असे सांगून मुलगी घरातून निघून गेली. मात्र, बऱ्याच वेळानंतरही ती घरी न परतल्याने तिची आई व भावाने उरुळी कांचन व परिसरात शोध घेतला. मात्र, तिचा कोणताही सुगावा लागला नाही. गणेश डोईफोडे यानेच ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी संशयित आरोपी गणेश डोईफोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ शिंदे करत आहेत.







