पुणे : किल्ले प्रतापगडावर उद्या बुधवारी (ता. ३०) ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
शिवप्रतापदिनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभातलोढा तसेच सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर यावर्षी लेझर शोच्या माध्यमातून देखील शिवप्रताप दिनाचा इतिहास शिवभक्तांना दाखवला जाणार आहे. याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे, असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
शासकीय सोहळ्याबरोबर राज्यातील शिवभक्तांना देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे या परिसरामध्ये राज्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त येण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शिवभक्त येणार असल्याने यावेळी वाहतुकीत देखील बदल करण्यात येणार आहेत.
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर हा शिवप्रताप दिन साजरा होत असल्याने सर्वच शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे