पाचगणी : माहिती अधिकार दिन म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीचे हत्यार आहे. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे यांनी व्यक्त केले.
यावर्षी २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी तसेच ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी असल्याने, नियमित कार्यालय सुरू झाल्यास, माहिती अधिकार दिन सर्वसामान्य जनतेबरोबर साजरा करावा, अशा आशयाचे निवेदन प्रदेश दलित विकास आघाडी, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने विविध शासकीय कार्यालयात देण्यात आले.
या वेळी सतीश साळुंखे, प्रमोद घाडगे, निलेश मोरे, शुभम ननावरे आदी उपस्थित होते. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून, या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे ही शासन व प्रशासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, असा शासन निर्णय सादर झाला आहे.
दरवर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून, तसेच प्रसिद्धी देऊन नागरिकांना माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे शासनाने सुचविले आहे.