पै. राहुल सूळ ठरला नायगाव येथील श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्वरीचा मानकरी
बापू मुळीक
सासवड: नायगाव (ता. पुरंदर) येथील श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्वरी यात्रा शुक्रवार या दिवशी सुरुवात होऊन, प्रथम हळदी समारंभ झाला. तर शनिवारी दिवशी सकाळी महाआरती, ग्राम प्रदक्षिणा, दंडवटाचे कार्यक्रम पार पडले. रात्री मानाच्या काठ्यांचे सासवड, पेरणे, यलकेभादे, पारगाव, सिंगापूर, एखतपुर, मुंजवडी, न्हावरे, भोंडवेवाडी, कोथळे या काट्यांचा कार्यक्रम पार पडला. नंतर महाप्रसादाचे वाटप झाले. देवाच्या पालखीतून मिरवणूक व छबिण्याचा कार्यक्रम पार पडला. रविवार या दिवशी सम्राञी विठाबाई भाऊ (मांग) लोकनाट्य तमाशा पार पडला. यात्रा आयोजित भव्य कुस्ती आखाड्यात पै. राहुल सूळ याने पै. गोपाळ कोळी याला चितपट करून श्री सिद्धेश्वर माता जोगेश्वरी चा किताब पटकावला आहे. यावेळी ७१ हजार रुपयांचा इनाम शेवटच्या कुस्तीला ठेवण्यात आला होता. नायगाव ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी 250 पहिलवानांनी हजेरी लावली होती. तर या ठिकाणी 125 कुस्त्या पार पडल्या. आखाड्याचे पूजन सरपंच बारीकराव खेसे व उपसरपंच मनीषा कड यांनी केले. 71 हजार रुपयांचे बक्षीस पै. राहुल सुळ यांना सरपंच बारीकराव खेसे व यात्रा कमिटी नायगाव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पंच म्हणून 120 कुस्त्यासाठी बाळासो शेडगे, संदीप खेसे, अशोक होले, डॉ. यशवंत कड, रमेश कड, बाळासो कड, यांनी काम पाहिले. शेवटच्या पाच नामांकित कुस्त्यासाठी पंच म्हणून संजय बोरकर, आप्पा भांडवलकर, वासुदेव बनकर, तर कोच म्हणून राहुल हेगडे व सुरेश चव्हाण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पंच व कोच म्हणून काम पाहिले. यात्रा कमिटी नायगाव च्या वतीने दुसऱ्या कुस्तीस 61 हजाराचा इनाम होता, यात पै. अक्षय चव्हाण यांनी डंकी डाव करून, पै. विजय सुरडे ला चितपट केले. तिसरी कुस्ती समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने ठेवली होती, यात पै. प्रकाश कारलेला चितपट करून, पै. निखिल कदम यांनी 40 हजाराचा इनाम जिंकला. चौथ्या कुस्तीस प्रवीण चोपडा अध्यक्ष देवस्थान नायगाव यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा इनाम हा पै. प्रसाद जगदाळे व पै. पृथ्वीराज घोडके यांच्यात समसमान झाला. यावेळी दिलीप फडतरे, सिद्धेश्वर खेसे, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, उपाध्यक्ष, यात्रा कमिटी नायगाव, आजी ,माजी, सरपंच ,उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ,समस्त ग्रामस्थ नायगावकर, कुस्त्यांचा आखाडा हा सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत चालला होता. स्पर्धेसाठी नामांकित 250 पहिलवानांनी सहभाग नोंदवला होता. लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी तुफान गर्दी केली होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक सागर चौधरी यांच्या निवेदनामुळे अंतिम शेवटच्या पाच कुस्त्यांमध्ये खूप मोठी चुरशीची रंगत नायगावकरांना पाहायला मिळाली.