पुणे : उत्तरेतील धुक्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी पुणे विमानतळावरील विमान सेवेला फटका बसला आहे. पुणे विमानतळावरून सकाळी होणारी 5 उड्डाणे आणि येणारी 7 विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले. त्यातच विमान कंपन्यांकडून विमाने रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना न करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांचे कर्मचारी यांच्यात वाद देखील झाला.
सोमवारी पुणे विमानतळावरील ११ उड्डाणे आणि इतर शहरांतून पुण्याला येणारी ९ विमाने रद्द करण्यात आली होती. पुणे विमानतळावर मंगळवारी पाच विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. याचवेळी इतर शहरांतून पुण्यात येणारी सात विमाने रद्द करण्यात आली. याबाबत विमान कंपन्यांनी प्रवाशांना सूचना केल्या नाहीत. त्यामुळे संतप्त प्रवाशांना चुकीच्या नियोजनाबद्दल विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले.
रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी ५० विमाने रद्द झाली आहेत. तर, अनेक विमानांना उशीर झाला आहे.
यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी सात आणि पुण्यातून जाणारी पाच अशी बारा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये दिल्लीच्या 6 विमानांचा समावेश आहे. तर, चंडीगड, गुवाहाटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीर देखील झाला.