लोणी काळभोर, (पुणे) : कार्तिकी एकादशी च्या दिवशी झालेल्या या आरोहण मोहिमेत मुख्य चढाईचे (लिड क्लाइंबिंग) नेतृत्व युवा गिर्यारोहक राजगुरुनगर चे अक्षय भोगाडे यांनी केले. मूळचे नाशिकचे असणारे चेतन बेंडकुळी यांनी जीवन दोर किंवा सुरक्षा दोरी (बिले रोप) सांभाळून या प्रस्तरारोहण मोहीमेत मोलाचे योगदान दिले.
हाताची व पायाची मजबूत पकड घट्ट करून सरळसोट उभ्या कातळावर चढाई करताना मुक्त व कृत्रिम आरोहण तंत्राचा वापर करून प्रस्तरारोहण केले जाते. अक्षय ने आतापर्यंत यशस्वीपणे लीड केलेल्या बाण सुळका (७१० फूट), शेंडी सुळका १२० फूट ( हरिश्चंद्र गड), कळकराई सुळका १५० फूट (ढाक बहिरी), सन डे वन सुळका २७० फूट अशा कित्येक खडतर मोहिमा गिरिप्रेमी तर्फे घेतल्या जाणाऱ्या बेसिक आणि ऍडव्हान्स क्लाइंबींग कोर्स मुळे शक्य झाल्याचे तो आवर्जुन सांगतो. कडाक्याच्या थंडीत पहाटे ६:३० वाजता सुरू झालेली ही मोहीम ११:३० वाजता शिखर माथ्यावर तिरंगा फडकावून पूर्णत्वास गेली.
त्र्यंबकेश्वर परिसर म्हटला तर प्रस्तरारोह्कांसाठी पर्वणीच आहे. इथल्या प्रत्येक डोंगर माथ्यावर दगडी साज चढवला आहे. त्यातील एक आव्हान म्हणजे संडे वन सुळका पण संडे वन असे याचे नामकरण का झाले असावे याचा काही मागमूस लागत नाही बहुतेक एखाद्या रविवारी ह्या सुळक्याच्या माथ्याला मानवी स्पर्श झाला असावा म्हणून इथले गावकरी मात्र या सुळक्याच्या कळपाला गणेश बारी अशीच हाक मारतात.
दरम्यान, या मोहिमेचे नेतृत्व फोर्ट अडव्हेंचर पुणे ग्रुपचे सचिन पुरी आणि मावळे माउंटन रेंजर्स ग्रुपचे राहुल काळे तसेच अजित आरुडे, प्रवीण दोरगे, भाग्येश जाधव, रवी कुंभार, चेतन आहेर, गणेश, अभिनव आरूडे, दिगंबर शिंदे, विजय सावंत, सुप्रिया सावंत आणि ७ वर्षांचा सुजय याचाही या मोहिमेच्या यशात सिंहाचा वाटा आहे.