पुणे : दोन वर्ष कोरोना महामारीमुळे राज्यातील चाकरमान्यांना गौरी-गणपतीला कोकणात आपल्या गावी जाता आले नाही. यंदा मात्र त्यांचा उत्साह कमालीचा असून विक्रमी एसटी बस या वर्षी आरक्षित झाल्या आहेत.पुणे विभागातूनही कोकणासाठी सध्या जादा बस सोडण्यात येत आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या विभागातून बस सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी जादा बसचे नियोजन केले आहे. कालपर्यंत (ता.२२ ऑगस्ट) ३,३६१ बस आरक्षित झाल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे. यामध्ये ग्रुप आरक्षण करणाऱ्या बसची संख्या सर्वाधिक १,९१२ आहे, तर १,०२२ बसचे प्रवाशांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरक्षण केले असून ४२७ बस अंडर बुकिंग असल्याचे सांगितले.
दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षी मात्र रेकॉर्ड ब्रेक प्रवाशांचा एसटीच्या प्रवासाला प्रतिसाद मिळत असल्याने महसुलात वाढ होण्याची शक्यता एसटी प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर गणेशभक्तांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी एसटी महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची ठिकठिकाणी नियुक्ती केली आहे. यामध्ये बस पार्किंग व्यवस्था, इंधन व्यवस्था, अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक, बसची सुसज्जता, बसची मार्गस्थ दुरुस्ती, माहिती कक्ष, दक्षता पथक, तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.