-संतोष पवार
पळसदेव : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात कारागृह शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर देण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे रिक्त असलेल्या 1 हजार 88 जागांवर पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रक्कम भरावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 600 रुपये भरायचे आहेत. तर इतर प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना 150 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यांसारख्या अटी पात्र असणे अनिवार्य आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान18 वर्षे असावे. अशाच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त 26 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी उमेदवाराला किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवाराची नियुक्ती केली जाईल.