महेश सूर्यवंशी
Mpsc News : दौंड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (Mpsc News) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत देऊळगाव राजे (ता.दौंड) येथील विशाल ईश्वर पोळ हा उत्तीर्ण झाला असून गावात पहिला फौजदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. (Mpsc News)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२० साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.४) दुपारच्या सुमारास लागला. या परीक्षेत विशाल पोळ यांनी गरुडझेप घेऊन यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु विशाल पोळ यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
विशाल पोळ यांनी प्रथांमिक व माध्यमिक शिक्षण गावातूनच पूर्ण केले. तर पुढील शिक्षण दौंड येथील विद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च पदवी प्राप्त केली. देऊळगाव राजे (ता.दौंड) सारख्या छोट्याशा खेडेगावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहोचणारा तो गावातील पहिलाच अधिकारी झाला आहे.
दरम्यान, विशाल पोळ याने पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना विशाल पोळ यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना विशाल पोळ म्हणाला कि, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये. तर नव्या जोमाने अभ्यास करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. आई-वडील व मोठे बंधू तथा देऊळगाव राजेचे पोलीस पाटील ॲड. सचिन पोळ यांच्या आशीर्वादामुळे हे यश मिळाले आहे.