हनुमंत चिकणे
बार्शी (सोलापूर) : हार न मानता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. त्यासाठी फक्त यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. याचा प्रत्यय गुळपोळी (ता. बार्शी) येथील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील भारत सावंत यांच्या यशातून दिसून येतो.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला. परंतु, सलग अपयश येऊनही हार न मानता जिद्दीने २०२१ साली एमपीएससीतून घेण्यात आलेल्या सहाय्यक करपदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.
या यशाबद्दल स्वप्नील सावंत सांगतात की, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. आई मजुरी करत होती तर वडील कारखान्यावर कामाला होते. दोन मुली, दोन मुले असल्याने संपूर्ण शिक्षणाचा भार हा दिवगंत कैलासवासी चुलते सदशिव सावंत यांनी उचलला.
स्वप्नील सावंत यांचे पहिली ते चौथीचे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा वैराग या ठिकाणी झाले. पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण हे शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर (ता. मोहोळ) या ठिकाणी झाले आहे. तर आठवी ते दहावीचे शिक्षण हे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी (ता. बार्शी) येथे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण हे झाडबुके विद्यालय या ठिकाणी पूर्ण केले. तसेच बीएससी ही पदवी शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून पूर्ण केली.
त्या काळात वडिलांचे छत्र हरपले. त्यावेळी पैशाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासत होती. तर आईने स्वतःचे सोने गहाण ठेवून पदवीच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. यावेळी शिक्षणाच्या बाबतीत कसलीही कमतरता भासू दिली नाही. याकाळातच शिक्षणासाठी काही जमीनी देखील विकल्या. परंतु मी चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. त्यांच्या कष्टामुळेच शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसत शिक्षणासाठी पैसा उभा केला.
जिद्द व चिकाटीने अभ्यास करत स्पर्धा परीक्षांची तयारी..
घरच्या या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिद्द व चिकाटीने अभ्यास करत पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी नियोजन केले. स्वयंअध्ययनावर भर देत स्वप्नीलने नुकतेच सहाय्यक करपदी यश मिळविले. त्याला आई, भाऊ, मित्र व कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. एकीकडे स्पर्धा परीक्षेत यश नव्हते, हातात नोकरी नव्हती, वय वाढत चालले होते, समाजात बोलणे खावे लागायचे. अशा परिस्थितीत कुटुंबीय व मित्र परिवाराने पूर्णपणे पाठिंबा दिला. जवळपास एमपीएससीच्या सलग अपयशानंतर पाठीमागील चुका सुधारत एक नव्या उमेदीने व जोशाने परीक्षेला सामोरे गेलो अन् वयाच्या ३१ व्या वर्षी निवड झाली.
दरम्यान, स्वप्नील सावंत यांची मागील महिन्यात मंत्रालयात लिपिक टंकलेखन या पदासाठी निवड झाली होती. तर काल लागलेल्या एमपीएससीच्या निकालात स्वप्नील सावंत यांची कर सहाय्यकपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने गावात मिरवणूक काढण्यात आली. तसेच संपूर्ण गावात त्यांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत बोलताना स्वप्नील सावंत म्हणाले, “२०१७ पासून वारंवार अपयश आले. मात्र हताश व निराश न होता अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जावू नये, पुन्हा प्रयत्न करीत राहावे. परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाला मेहनत व अभ्यासाची जोड दिल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते.”