विशाल कदम
MPSC News जिंती : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. (MPSC News) हे जिंती (ता. करमाळा) येथील शेतकरी दत्तात्रय धेंडे यांचे चिरंजीव ओंकार धेंडे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. (MPSC News)
जिंती (ता. करमाळा) येथील ओंकार धेंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२० साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात स्थान प्राप्त करून गरुडझेप घेतली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु ओंकार धेंडे यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
जिंती गावातील पहिलाच एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी
ओंकार धेंडे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिंती येथून पूर्ण केले. तर करमाळा येथील विद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च पदवी प्राप्त केली. जिंती (ता. करमाळा) सारख्या छोट्याशा खेडेगावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहोचणारा तो गावातील पहिलाच अधिकारी झाला आहे.
दरम्यान, शेतकऱ्याच्या पुत्र ओंकार धेंडे याने पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना ओंकार धेंडे यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिंती येथील जिल्हा प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जगताप व सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप व सिद्धार्थ तरुण मंडळ जिंती यांच्याकडून ओंकार धेंडे यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे प्राईम न्यूजशी बोलताना ओंकार धेंडे यांनी सांगितले की, हे यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व आई-वडील यांच्या चरणी अर्पण करीत आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर गाठून नक्की अधिकारी बनू शकता.