पुणे : महापालिकेत नव्या २०० पदांची भरती तसेच आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे. महापालिकेकडून सध्या ४४८ पदांची भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आणली आहे.
कनिष्ठ अभियंता, लिपिक, अतिक्रमण सहायक निरीक्षक, सहायक विधी सल्लागार या पदांवरील ४४८ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ऑनलाइन परीक्षेनंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर कनिष्ठ अभियंता पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यातच या नव्या दोनशे पदांची भर पडणार आहे. अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात २०० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये काही जागा या वरिष्ठ पदांसाठी असणार आहे. महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्याने २००७ मध्ये तयार केलेल्या आकृतिबंधातील जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात आकृतिबंधाचा आढावा घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.