पुणे : राज्यात ४ हजार १२२ तलाठयांची भरती लवकरच महसूल विभागामार्फत होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. तसेच येत्या १५ दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. हे निर्देश राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी दिले आहेत.
राज्यात तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरच भरती घेण्याचे निर्देश महसूल विभागामार्फत दिले गेले आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशील जिल्हानिहाय मागविण्यात आला आहे.
दरम्यान, तलाठी नसल्याने ग्रामपंचायतींपासून गावांवर आणि लोकांना मिळणाऱ्या सेवांवर मोठा परिणाम होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्या वतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. त्याला आता शासनाने प्रतिसाद दिला आहे.
राज्यात तलाठ्यांच्या १ हजार १२ रिक्त जागा आहेत. तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ३ हजार ११० या पदांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच ४१२२ पदे महसूल विभागाच्या वतीने लवकरच भरण्यात येणार आहेत.
राज्यातील महसूल विभागातील विभागनिहाय पदसंख्या
१) पुणे विभाग : ७४६ जागा
२) नागपूर विभाग : ५८० जागा
३) अमरावती विभाग : १८३ जागा
४) नाशिक विभाग : १०३५ जागा
५) औरंगाबाद विभाग : ८४७ जागा
६) कोकण विभाग : ७३१ जागा