पुणे प्राईम न्यूज डेस्क: भारतात सध्या तोंडाचा आणि विशेषतः जिभेचा कर्करोग झपाट्याने वाढताना दिसतो आहे. धूम्रपान, तंबाखू, गुटखा, पान मसाला आणि अल्कोहोल यांचा सततचा वापर, तसेच काही अनुवंशिक कारणांमुळे हा आजार उद्भवतो. परंतु डॉक्टरांच्या मते, याचे लक्षणे लवकर लक्षात आल्यास उपचार यशस्वी होऊ शकतात.

जिभेचा कॅन्सर म्हणजे काय?
जिभेच्या पेशींमध्ये सुरू होणारा हा कर्करोग तोंडाच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. तो जिभेच्या पुढच्या भागात किंवा घशाच्या मागच्या बाजूला होतो. भारतामध्ये पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात हा आजार आढळतो. ४० वर्षांवरील वयोगट सर्वाधिक प्रभावित आहे.
जिभेच्या कॅन्सरची लक्षणं:
1. जिभेवर बरे न होणारा फोड (2–3 आठवड्यांतही न बरे होणे)
2. जिभेवरील जखमेतून रक्तस्त्राव
3. जेवताना किंवा बोलताना वेदना
4. लाल किंवा पांढरे डाग जिभेवर
5. घशातून अन्न गिळताना त्रास
6. जिभेचा बधीरपणा, चव जाणवेनाशी होणे
7. आवाजात बदल, तोंडातून दुर्गंधी
8. जिभेवर सूज किंवा गाठ
9. जबड्यात किंवा घशात कडकपणा
कर्करोगाची टप्प्यांनुसार लक्षणं व उपचार:
स्टेज १ व २: सुरुवातीची अवस्था, पूर्णपणे बरे होण्याची शक्यता जास्त असते. औषधं, शस्त्रक्रिया व कीमोथेरपीने उपचार यशस्वी होतात.
स्टेज ३: कर्करोग पसरलेला असतो. आयुष्य वाढवता येऊ शकतं, पण उपचार जटिल होतात.
स्टेज ४: रोग इतर अवयवांमध्ये पसरतो. उपचार मर्यादित, धोका अधिक असतो.
कर्करोग टाळण्यासाठी काय करावे?
1. तंबाखू, गुटखा, धूम्रपान व अल्कोहोल बंद करा
2. तोंडाची स्वच्छता ठेवा
3. वर्षातून एकदा तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करा, विशेषतः तंबाखू वापरणाऱ्यांनी
4. निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली ठेवा
कर्करोगाची लक्षणं लवकर लक्षात घेणं, आणि वेळेत तपासणी व उपचार करणं हाच एकमेव उपाय आहे. जिभेवर सतत होणारा फोड, डाग, वेदना वा बदल दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ यातून कोणताही दावा करीत नाही.)







