Loni kalbhor News लोणी काळभोर : वय वर्ष अवघे बारा… खेळण्या-बागडण्याच्या या वयात तिला अचानक कडाक्याचा ताप आला… डाव्या पायाच्या आणि हाताच्या असंबद्ध हालचाली सुरू झाल्या… आई-वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली… वेळ न दवडता त्यांनी तिला लोणी काळभोर (Loni kalbhor News) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात पुढील उपचारासाठी दाखल केले. (Loni kalbhor News)
दरम्यान, तिची क्लिनिकल तपासणी केली असता, मेंदूज्वराशी अर्थात मेनिंजायटीसशी सुसंगत लक्षणे आढळून आली… अन् आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली! प्रसंग बाका होता. पण म्हणतात ना, देव तारी, त्याला कोण मारी… या प्रसंगी विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टरच देवदूत होऊन धावून आले, अन् तिला या असाध्य रोगाच्या खाईतून सहीसलामत बाहेर काढले.
सई (नाव बदलले आहे) या बारा वर्षांच्या मुलीला असाध्य आजाराने ग्रासले होते. विश्वराज हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञांसाठी ही आव्हानात्मक केस होती. डॉक्टरांनी रोगनिदान करण्यासाठी तिच्या आणखी काही तपासण्या केल्या असता, तपासणीमध्ये न्यूरल इमेजिंगमध्ये मेंदूमध्ये संसर्ग होऊन गळू असल्याचे निदर्शनास आले. गळूचा संसर्ग मेंदूमध्ये पसरू नये यासाठी डॉक्टरांनी वेळ न दवडता रुग्णाला अँटीबायोटिक्स सुरू केले. त्याचबरोबर तातडीने मेंदूतील गळू काढण्यासाठीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. रूग्णाची प्रकृती खालावू नये यासाठी बारकाईने निरीक्षण सुरू होते.
डॉक्टर कसोशीने प्रयत्न करत होते. पण अकस्मात काही भलतेच घडले. उपचारादरम्यान क्षारांचे प्रमाण बिघडल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. या परिस्थितीत रुग्णाला एका आठवड्याहून जास्त काळ वेंटिलेशनची आवश्यकता होती. यावर पर्याय म्हणून श्वासोच्छवास सुलभरित्या घेता यावा, यासाठी ट्रेकीओस्टॉमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान रुग्णाला मेंदूज्वरामुळे आकडीचा त्रास सुरु झाला. वैद्यकीय पथकाद्वारे यावर त्वरीत उपचार सुरु करण्यात आले. ज्यामुळे आकडीचा त्रास आटोक्यात आणण्यात यश आले.
या गुंतागुंतीतून रूग्णाला बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, पुढील प्रत्येक उपचारपद्धती डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती. आकडीचा त्रास आटोक्यात आणल्यानंतर रुग्णाला बुरशीजन्य (फंगल) संसर्ग झाला. गुंतागुंत वाढू नये म्हणून अँटीफंगल औषधांचा वापर करण्यात आला. बालरोगतज्ज्ञ आणि मेंदूविकार तज्ज्ञ यांच्या संयुक्त उपचारपद्धतीमुळे या असाध्य रोगाच्या विळख्यातून ती हळूहळू बाहेर पडू लागली. तिची प्रकृती कालांतराने सुधारत गेली. प्रत्येक गुंतागुंतीचे निराकरण करण्यासाठी आणि तिला या आजारातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
दरम्यान, एक महिन्याच्या दीर्घ उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. मेंदूज्वराची लक्षणे कमी होत गेली तसेच डाव्या पायाची आणि हाताची शक्ती पूर्ववत होऊ लागली. विश्वराज हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत सहारे आणि मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. दर्शन गौड यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने कौशल्य दाखवून वेळीच उपचार केल्यामुळेच आज ती व्याधीमुक्त झाली. डॉक्टर हा रूग्णासाठी देवासमान असतो, याची प्रचिती रुग्णाच्या कुटुंबियांना यानिमित्ताने आली.
उत्तम आरोग्यसेवेसाठी विश्वराज हॉस्पिटलची स्थापना
सेरेब्रल गळू आणि त्याच्या गुंतागुंतीपासून यशस्वी रिकव्हरीमुळे सर्वसमावेशक उपचार पद्धतीचे महत्त्व आणि वैद्यकीय पथकाचे अतूट समर्पण दिसून आले. विश्वराज हॉस्पिटल हे २५० खाटांचे टर्शरी केअर, एनएबीएच (NABH) मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे. विश्वराज हॉस्पिटलची स्थापना रुग्णाच्या आर्थिक स्थितीची पर्वा न करता, उच्च दर्जाची आरोग्य सेवा देता यावी, या मुख्य हेतूने केली आहे. मोफत आरोग्य शिबिरे आणि आरोग्य चर्चा यासह विविध आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजाला आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णालय समर्पित आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…