डॉ. निलेश उपरे
पुणे प्राईम न्यूज डेस्क: देशातील अनेक राज्यांमध्ये गालफुगी अर्थात गालगुंड या आजाराची साथ पसरली आहे. त्यापासून दूर राहणे गरजेचे बनले आहे. या गालफुगीचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचे समोर आले आहे. गालगुंडाची लक्षणं मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतात. पण काही ठराविक केसेसमध्ये ही लक्षणं मुलांचे कान, स्वादुपिंड किंवा जननेंद्रियावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे आपल्या मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
गालगुंड या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. हा आजार लहान मुलांमध्ये सामान्य आहे. साधारणत: 5 ते 15 वयोगटातील मुलं या आजाराने ग्रासली जातात. कधीकधी हा आजार प्रौढांमध्येही आढळून येतो. गालगुंड एक विषाणूजन्य आजार असून, ज्याचा प्रादुर्भाव हिवाळ्यात वाढतो. हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याद्वारे मुलांच्या शरीरात प्रवेश करतो. गालफुगी गालगुंड हा विषाणूजन्य आजार आहे, त्यात पॅरोटिड ग्रंथीला सूज येते हा विषाणू थूमकेतून पसरतो.
आजारात नेमकं काय होतं?
गालगुंड या आजारात मुलांच्या लाळग्रंथी सुजतात. त्यामुळे त्यांच्या गालांचा काही भाग सुजतो. कधी-कधी दोन्ही गाल सुजतात. हा आजार झालेल्या मुलांना अन्न गिळता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. यामुळे त्यांच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो.
गालगुंडाची लक्षणे काय?
या आजारात थंडी भरून ताप येतो. गालगुंडाच्या भागात असह्य वेदना होतात. डोकेदुखी आणि कानदुखी या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, तोंडाचा जबडा उघडताना त्रास होतो. त्यामुळे अन्न चावणे व गिळणे त्रासदायक ठरते. सूज येते. डोकेदुखीही होते. स्नायूंचे दुखणे सुरु होते. या आजारात सांधेदुखीची समस्या देखील जाणवू शकते. जबड्यामध्ये सूज येते. तोंड कोरडे पडू लागते. भूक कमी होते. अशक्तपणाही जाणवतो. चिडचिडेपणाही या आजारात जाणवू लागतो. याशिवाय आणखी काही लक्षणे आहेत.
गालफुगीवर उपचार काय?
जेव्हा हा आजार उद्भवतो तेव्हा काही वेळेला विषाणू संसर्ग पसरून इतर ग्रंथींनाही सूज येते व त्यामुळे गळा, छातीमध्येही वेदना होतात. पण यावर उपचार किंवा उपाय म्हटलं तर अनेक विषाणूजन्य आजारांप्रमाणे या आजारावरही काही ठराविक औषध नाहीत. रुग्णाला जी लक्षणं दिसतात, त्यानुसार त्यांना औषधं दिली जातात. याशिवाय, मल्टी-व्हिटॅमिन आणि मल्टी-मिनरल्सच्या गोळ्याही दिल्या जातात.
गालगुंडावर विशेष उपचार नसले तरी आठवड्याभरात होतो बरा
गालगुंडाला विशेष उपचार नाहीत. हा आजार आठवड्याभरात बरा होतो. या आजारामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पेन किलर औषधे तसेच सूज कमी करण्यासाठी व ताप कमी होण्यासाठी काही ठराविक औषधे दिली जातात. गालगुंड या आजारात शक्यतो काही दिवस पातळ पदार्थ सेवन करणे उत्तम असते. तिखट व गरम तसेच घट्ट पदार्थ दिल्यास या ग्रंथींवर अधिक ताण येतो व बरे होण्यास वेळ लागतो.
(लेखक हे बालरोगतज्ञ असून विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर येथे कार्यरत आहेत)