पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या चर्चेत असलेला उपवासाचा प्रकार म्हणजे ‘इंटर्मीटंट फास्टींग’ म्हणजेच अधूनमधून केला जाणार उपवास होय. यामध्ये 12 ते 14 तास अन्न घेतले जात नाही. सामान्य आरोग्य स्थिती असलेल्या लोकांसाठी याचे चांगले फायदे होतात. ठरावीक कालावधीत सातत्याने उपवास केल्याने शरीराचे वजन, रक्तदाब, चरबी, रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. मात्, आरोग्याची स्थिती चांगली नसणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ‘इंटर्मीटंट फास्टींग’ करू नये.
‘इंटर्मीटंट फास्टींग’ केल्याचे परिणाम:
यात खाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे कॅलरीजचे सेवन मर्यादित राहते. यामुळे तुमचे शरीर ऊर्जेसाठी चरबीच्या साठ्याचा उपयोग करते. यामुळे केटोन्स नावाचे फॅटी अॅसिड रक्तप्रवाहात सोडले जाते. हे कार्बोहायड्रेट्सऐवजी शरीरासाठी पर्यायी इंधन स्रोत म्हणून काम करते. यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.
अधूनमधून उपवास करायच्या या पद्धतीमुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच जळजळ कमी होते. उष्मांक कमी प्रमाणात मिळाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ व्यक्तींना अधून मधून उपवास करण्याची पद्धत फायदेशीर ठरू शकते.