पुणे : व्यस्त जीवनशैली आणि कामामुळे बहुतेक लोक आपली झोप पूर्ण करू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या नावाखालीही लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय लावत आहेत. पण, या आधुनिक सवयीमुळे आजारांना सामोरे जावे लागू शकते. यावर अभ्यासही करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे समोर आले की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो.
अभ्यासकांच्या मते, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. हार्वर्ड मेडिसिन स्कूलमधील संशोधकांनी 60 हजार महिला परिचारिकांचा अभ्यास केला. रात्री काम करणाऱ्या परिचारिका कमी व्यायाम करू शकत होत्या आणि अनहेल्दी फूड खात होत्या. याचा त्यांच्या जीवनशैलीवर खोलवर परिणाम झाल्याचे या अभ्यासातून समोर आले.
अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसा काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत रात्री जागून काम करणाऱ्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका 19 टक्के जास्त असतो. याचबरोबर, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि दिवसा झोपतात, त्यांच्या झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया बिघडते. शरीरात चरबी जमा होते आणि टाइप 2 मधुमेहासारखे गंभीर आजार होतात.
तसेच जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्या चरबीच्या चयापचयात मोठा फरक असल्याचे संशोधनात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.