पिंपरी : कर्करोग (कॅन्सर) हा भयानक आजार आहे. मात्र, वारंवार काही तपासण्या केल्यास आणि पहिल्या दोन ते तीन स्टेजमध्ये आजार असेल तर नक्कीच तो बरा होऊ शकतो, असे कर्करोगतज्ञ डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितले.
पुणेरी येलमार स्नेह मेळावा रविवारी मधुरा लॉन्स, पुनावळे येथे पार पडला. यावेळी कर्करोगावरील मार्गदर्शन आणि निदान या विषयावर डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते रंगनाथ येलमार, येलमार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल माडगूळकर, उपाध्यक्ष भीमराव होळकर, प्रा. श्रीनिवास येलपले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल विभूते, विद्या कंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्करोगावरील प्राथमिक तपासण्या फारच माफक दरात होतात. छातीचा किंवा पाठीचा एक्स-रे केला तरी काही कळू शकते. आज काल बसून काम करणाऱ्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचबरोबर तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांपैकी बहुतांश जणांना होतोच. काहींना अनुवंशिक आजार आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, योग्य वेळी तपासण्या करून योग्य निदान घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे डॉ. पाटील म्हणाले.
यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त अकूताई उलभगत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुस्तीपट्टू पै. विलास कंडरे, सुभाष येलमार, विनय येलपले, अमोल येलमार, सूर्यन येलमार, उषा कोळवले, वामन येलमार आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊसाहेब कंडरे, सौरभ उलभगत, बलभीम कोळवले, सुनील पाटील, सुनील येलमार, नामदेव येलमार, सुभाष येलमार, डॉ. प्रशांत कोळवले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अशोक येलमार यांनी तर आभार अमोल येलमार यांनी मानले.