आपल्या आरोग्याची काळजी घेणारे आपल्यापैकी अनेकजण असतील. त्यासाठी व्यायाम, आहार याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यात रिकाम्या पोटी खजूर-बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. रोज सकाळी 3 खजूर आणि 5 बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
खजूर आणि बदामाचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो. यामुळे मन खंबीर राहतेच शिवाय हृदय निरोगी ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. खजूर आणि बदाम यांचे मिश्रण सकाळी उर्जा वाढवणारे आहे. खजूरमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज आणि फ्रक्टोज) असते, जी त्वरित ऊर्जा प्रदान करते. बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असतात, जे शरीर दिवसभर अॅक्टिव्ह ठेवतात. नाष्टापूर्वी हे खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर उत्साही वाटते.
जर तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय असेल किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल तर खजूर आणि बदाम खूप उपयुक्त ठरू शकतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवतात. खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे मेंदूतील सूज कमी करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात.
याशिवाय, खजूर आणि बदाम हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे मिश्रण हृदयविकाराचा धोका कमी करते आणि हृदय मजबूत करते. त्यामुळे याचा आहारात वापर करावा.