Big News पुणे, ता. ३१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मागील वर्षभरात राज्यभरातील १० हजार ६४१ रुग्णांना तब्बल ८६ कोटी ४९ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची शासकीय आकडेवारी पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मदत मिळवण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी ८६ कोटींहून अधिक रकमेची आर्थिक मदत मिळू शकली आहे. (Big News)
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मिळालेल्या निधीत पुणे जिल्ह्याने बाजी मारली असून, जिल्ह्यातील ८७९ रुग्णांना तब्बल ७ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ निधी मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, या जिल्ह्यातील ९५४ रुग्णांना ७ कोटी ६६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. (Big News)
दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी तातडीने व विनासायास मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 8650567567 हा मोबाईल क्रमांक सुरु केला आहे. वैद्यकीय मदत हवी असणाऱ्या गरजूंनी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर केवळ मिसकॉल दिल्यास संबंधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आता सहज, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत निधी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. (Big News)
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी तातडीने व सहजरित्या मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मविआ सरकारने हा कक्ष बंद केला होता. २०२२ मध्ये सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला गेला. (Big News)
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाने मदतीत टाकली कात
मंगेश चिवटे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाने मदत देण्याबाबत कात टाकली असून, मागील वर्षभरात राज्यातील १० हजार ६४१ रुग्णांना ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत केली गेली. वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ९५४ रुग्णांना ७ कोटी ६६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील ८७९ रुग्णांना ७ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. गडचिरोलीतील ७ रुग्णांना ७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील ११ रुग्णांना ११ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. (Big News)
कसा मिळतो निधी?
निधी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. सोबत वैद्यकीय खर्चाचे डॉक्टरांचे अंदाजपत्रक मूळ प्रतीत द्यावे लागते. खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडून ते प्रमाणित करून घ्यावे लागते. तहसीलदारांचा दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, आजारांचे सर्व रिपोर्ट, रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या प्रणालीवर असावी. अपघाताच्या प्रकरणात एफआयआर असावा, अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मदतीसाठी ३ लाखांपर्यंत वाढवली मर्यादा
याबाबत अधिक माहिती देताना मंगेश चिवटे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कक्ष बंद केला गेला होता. काही रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली गेली. मात्र, त्याची मर्यादा केवळ २५ हजार रुपये इतकीच होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मर्यादा आता ३ लाखांपर्यंत वाढवली आहे. हृदयविकार, गुडघे व खुब्यांचे प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनी विकारावरील उपचाराबरोबरच, भाजलेल्या, विजेचा धक्का बसलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज येत आहेत. यातील बहुतांश अर्ज अपूर्ण असल्याने, मुख्यमंत्री कार्यालयाला मदत करण्याची इच्छा असूनही, गरजूंना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच शासनाने ८६५०५६७५६७ हा मोबाईल नंबर जारी केला आहे’.
येत्या काळात ॲपही बनवले जाणार
मदत हवी असणाऱ्या गरजूंनी ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमाकावर मिसकॉल देताच, संबंधित मोबाईलवर अर्जाची लिंक मोबाईलवर मिळते. मदतीसाठी दिलेल्या नंबरवर सध्या केवळ मिसकॉलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पुढील काही दिवसांत मदतीसाठी अॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल. एकाचवेळी सर्व अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.