ठाणे : ठाणे शहरात आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे 70 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 2009 मध्ये हा आजार समोर आला होता. तेव्हा एकच खळबळ उडाली होती. भारतातही अनेकांना या आजाराची लागण झाली होती. या आजारामुळे अनेक जण बळी पडल्याची माहिती समोर आली होती. पण या आजारावर योग्यप्रकारे उपचार घेतल्यास तर माणूस बरादेखील होतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
कसा होतो स्वाईन फ्लू आजार?
स्वाईन फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार असून H1N1 व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असेल तो शिंकला अथवा खोकला, तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात. याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला, तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्ल्यूची लागण होते.
स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे?
हुडहुडी भरणे वा थंड वाजणे, ताप येणे, सर्दी होऊन नाक वाहते राहणे, अंगदुखी तसेच डोके दुखणे, खोकला, घशात खवखव किंवा दुखणे, पोटात दुखणे, मळमळ किंवा उलटी होणे, यासाखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसू शकतात. विशेष म्हणजे 65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, तसेच मधुमेह , किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.