मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे. . वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
महेश कोठारे यांच्या संपूर्ण प्रवासात वडील अंबर कोठारे यांचा मोलाचा वाटा होता. अनेक सिनेमा, नाटकात त्यांनी कामं केली आहेत. ‘धुमधडाका’ हा त्यांनी त्यांनी निर्मिती केलेला सिनेमा प्रचंड गाजला. त्याचप्रमाणे ‘दे दणादण’ या सिनेमातही त्यांनी खलनायकाची भूमिका उत्तमरित्या वठवली होती. त्यांच्या निधनाने कोठारे कुटुंब दु:खात आहे. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींकडून अंबर कोठारे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.