मुंबई : बॉलीवुडचा भाईजान, दबंगस्टार सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.
टार्गेट किलिंगची योजना आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी चंदीगड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
चंदीगडच्या दादुमाजरा कॉलनीतून रविंदर सिंग आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंझा यांना 25 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी मोहाली-रहिवासी करण कपूरला अटक करण्यात आली असे पंजाब येथील गुन्हे शाखेचे डीएसपी उदय पाल यांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
भटिंडा येथील बिश्नोईचा बॅचमेट असलेल्या जावेद झिंजाने बेकायदेशीरपणे पैसे जमवले होते. त्याने चंदिगड आणि पंजाबमधील तरुणांना आपल्या नेटवर्कमध्ये सहभागी होण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्यावर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती चंदिगड पोलिसांनी दिली.जावेद झिंजाचा जवळचा सहकारी रविंदर सिंगने त्याला पैसे उकळण्यात मदत केल्याचा आरोप आहे
तर, तिसरा आरोपी करण कपूर हा आपल्या घरातून बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसाय चालवतो आणि त्याने अनेकांना परदेशात पाठवले असल्याची माहिती समोर आली.