मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षय कुमार गेल्या 3 दशकांपासून बॉलीवूडमध्ये आहेत. ते सतत त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. दोघांनीही आपापल्या फिल्मी करिअरची सुरुवात जवळपास एकाच वेळी केली आणि आजही दोघेही आपापले पद्धतीने सुपरस्टारच आहेत.
अक्षय कुमारने 1991 मध्ये आलेल्या ‘सौगंध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तर शाहरुख खानने 1992 मध्ये आलेल्या ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या दोन्ही कलाकारांनी आपल्या मेहनतीने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि काही वेळातच दोघेही सुपरस्टार म्हणून उदयास आले. आता प्रश्न पडतो की हे दोन सुपरस्टार एकत्र का काम करत नाहीत?
काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राकडून शाहरुखला विचारण्यात आले की, तो आणि अक्षयकुमार एकत्र चित्रपट का करत नाहीत, तेव्हा शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला, मी अक्षयप्रमाणे लवकर उठत नाही. अक्षयला जाग आलेली असते तेव्हा मी झोपेत असतो. त्याचा दिवस लवकर सुरू होतो. मी कामाला लागेपर्यंत तो पॅकअप करून घरी जात असतो. त्यामुळे तो जास्त तास काम करू शकतो. पण मी रात्री शूटिंगमध्ये असतो. माझ्यासारखे रात्री शूटिंग करणं अनेकांना आवडत नाही.
तसेच आम्ही जर एकत्र काम केले असते तर आम्ही सेटवर कधीच भेटलो नसतो. अक्षयसोबत अभिनय करायला मजा येईल. पण आम्ही दोघे सेटवर एकाच वेळी दिसणार नाही. जेव्हा अक्षय सेटवरून जाईल तेव्हा मी आत येईन. पण आमची वेळ जुळणार नाही, असे खुद्द शाहरूख याने कारण दिले.