हडपसर : यंदाचा ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ अमन तांबे पुणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार तर प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष देविदास पाटील व मित्रावरुण झांबरे यांनी दिली.
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे यंदाचे २४ वे वर्ष आहे. हा पुरस्कार जेष्ठ लोकनाटय़ कलावंत अमन तांबे पुणेकर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. तर ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
या पुरस्काराचे वितरण समारंभ गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दुपारी एक ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रेश्मा वर्षा परितेकर पार्टी, शाहीर सगनभाऊ ग्रुप जेजुरी,आर्यभूषण थिएटर ग्रुप पुणे, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट,पुष्पराज कलाकेंद्र जेजुरी,अ शा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत. लोक कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कार्यक्रम प्रवेशिका मोफत आहेत. महिलांसाठी राखीव जागा आहेत.
दरम्यान, लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने शकुंतला नगरकर, छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे, रघुवीर खेडकर,सरस्वतीबाई कोल्हापूरकर अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, डॉ.शंतनु जगदाळे, रेश्मा परितेकर, रामदास खोमणे, संदीप घुले, बापू जगताप, आकाश वाकचौरे यांनी दिली आहे