पुणे : ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली सर्वांची लाडकी सून अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या रेश्माच्या केळवणाला सुरुवात झाली असून तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदेने स्वतःच्या केळवणाचे फोटो शेअर करण्याआधी अभिनेता सुयश टिळकने फोटो शेअर केले होते. सुयशने रेश्माला शुभेच्छा देत केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण काही वेळानंतर सुयशने ती पोस्ट डिलीट केली. मात्र, रेश्माच्या केळवणाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिने स्वतः केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.
रेश्मानं केळवणसाठी हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर अगदी साधा मेकअप केला आहे. यामध्ये ती खूप देखणी दिसत आहे. रेश्माच्या लग्नाबद्दल तिनं फार काही भाष्य केलं नव्हतं. त्यामुळं केवळणाचे फोटो समोर आल्यानं तिच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता. फोटोत पाहायला मिळतं की, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अनघा भगरे, विदिशा म्हसकर, शाल्मली तोळे, आशुतोष गोखले, सुयश टिळक यांनी या केळवणाला हजेरी लावली होती.
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”, असं कॅप्शन लिहित रेश्माने केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच “नवरा कोण आहे?”, असं चाहत्यांकडून विचारलं जात आहे. रेश्माचा होणारा जोडीदार पाहण्याची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.