अजित जगताप
(Gautami Patil) सायगाव : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अदाकारी व नृत्यकलेने बहुचर्चित असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून एक वादग्रस्त नृत्यांगना म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. याबाबत गौतमी पाटील यांनी खुलासा सुद्धा केला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ या गावांमध्ये अश्विन बैलाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमापूर्वी तिचा सन्मान करून तिची ओटी भरण्यात आली तसेच आजीने नातीची पप्पी घ्यावी अशी पप्पी घेतल्यामुळे गौतमी पाटील अक्षरशः भारावून गेल्या.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खर्शी तर्फ कुडाळ ता. जावळी येथील बागायतदार शेतकरी व बैलप्रेमी सतीश भोसले यांनी आपल्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकारी व नृत्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला चांगली प्रसिद्धी मिळाल्यामुळे तुफान गर्दी जमली होती. या गर्दीला नियंत्रण आणण्यासाठी खर्शी तर्फ कुडाळ येथील सिद्धनाथ नाट्य कला संस्कृती क्रीडा मंडळ व श्रीराम वरदायिनी सांस्कृतिक मंडळाच्या तरुण कार्यकर्ते व युवकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नजर लागेल असा हा सदाबहार कार्यक्रम…
त्यामुळे अक्षरशः नजर लागेल असा हा सदाबहार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमापूर्वी खर्शी तर्फ कुडाळे येथील आजी लिलाबाई अंकुश भोसले यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे औक्षण केले व भारतीय परंपरेनुसार तिची ओटी भरण करण्यात आली. एका कलावंताला स्तुतीसुमनापेक्षाही मानसन्मान देण्याची गरज असते.
त्या पद्धतीने खर्शी तर्फे कुडाळ गावांमध्ये भारतीय संस्कृती प्रमाणे सत्कार व आपुलकी दाखवल्याबद्दल नृत्यांगना गौतमी पाटील यांना आपल्या कुटुंबातच आल्याचा भास निर्माण झाला होता. गौतमी पाटील यांनी ही आजीच्या पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. एवढेच नव्हे तर आजीने सुद्धा आपल्या थरथरत्या मायेच्या हाताने गौतमी पाटील यांना जवळ करत त्यांची पप्पी घेतली. आशीर्वाद दिला.
या प्रसंगाने गौतमी पाटील फारच भारावून गेल्या होत्या. दोन तास संपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्याची छाप पाहण्यास मिळाली होती. अत्यंत सुसंस्कृत व कलेला वाव देणाऱ्या या कार्यक्रमाला अक्षरशः तरुणांनी चांगलीच दाद दिली. कुठलाही अश्लीलपणा, वन्स मोर किंवा हुल्लडबाजी झाली नाही. स्वतः पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तासगावकर यांनी सुध्दा परिश्रम घेतले.
गौतमी पाटील यांच्यामध्ये बदल झाल्याची ही चुणूक पाहून खऱ्या अर्थाने गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हणजे एक आनंद देणारा क्षण अशी इतिहासात नोंद झाली आहे. खर्शी तर्फ कुडाळ गावच्या सरपंच दुर्गा भिसे, उपसरपंच कविता साळुंखे, पोलीस पाटील सुहास भोसले, ज्येष्ठ मार्गदर्शक लाला भोसले, जयेंद्र भोसले,अतुल भोसले, सुशांत भोसले, नितीन भोसले, दत्तात्रय भोसले व गावचे ग्रामस्थ, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अशा मान्यवरांनी आपापल्या पद्धतीने खूप मोठे योगदान दिले.
या कार्यक्रमाला महसूल, पोलीस यंत्रणा व परिसरातील सायगाव, रायगाव, आनेवाडी, मोरघर, महिगाव, दरे, पवारवाडी, मोरेवाडी, कदमवाडी, महामुलकरवाडी, मालुसरेवाडी, मेरुलिंग, धनगर पेडा,मर्ढे, लिंब, सातारा, विरमाडे, कळंबे, कुडाळ,आलेवाडी, मेढा, भणंग, करहर, हुमगाव,पाचवड तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुण्यातील काही परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी शांततेत कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याने संयोजकांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. जावळी तालुक्यातील हा पहिला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होता. जावळीकरांनी भरभरून प्रेम दिले ते कायम लक्षात राहणारे ठरले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा : गाण्यावरून दोन गट भिडले : पोलिसांची अखेर मध्यस्थी