उदयपूर : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. आज त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा राजस्थानच्या उदयपूर येथे पार पडला. या सोहळ्याला राजकीय, कला क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये या विवाह सोहळ्याचे रिसेप्शन होत आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या या विवाहसोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या लग्नसमारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या शाही विवाहसोहळ्यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मे महिन्यात साखरपुडा अन् सप्टेंबरमध्ये लग्न
परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्ली येथे आलिशान पद्धतीने झाला होता. या साखरपुड्याला अत्यंत जवळच्या लोकांनी उपस्थिती लावली होती. या दोघांचा साखरपुडा हा मे महिन्यात झाला आणि आज त्यांचे लग्न झाले.
दोघांची भेट यूकेमध्ये
परिणीती आणि राघव चढ्ढा यांची पहिली भेट भारताबाहेर झाली. यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठात परिणीती चोप्रा पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. त्यावेळी राघव चढ्ढा हे देखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते. हे दोघे भारतातील असून, दोघांची ओळख तिथेच झाली. त्यानंतर त्यांच्या लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.