Amruta Fadnavis Jhumka Real : पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सध्या त्यांचा एक रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर त्या गाडीत बसून डान्स करताना दिसत आहेत. “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्रॅफिकमध्ये वेळ घालवण्यासाठी “व्हॉट झुमका…” या गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून कानात गोल रिंग्स घातल्या आहेत. “व्हॉट झुमका…” गाण्याला साजेसे असे मोठे गोलाकार कानातले घातले नाही हे दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एका दिवसात ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु, त्याच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमृता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी “हे असलं गरजेचं आहे का?”,“मामी काय लक्झरी तोडायची आहे का”, “मामी तुम्हाला हे कसं जमतं” “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…”, “ही पोस्ट डिलिट करा अमृता ताई” अशा कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. पण, दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलेला आहे. “त्यांना स्वातंत्र्य आहे… त्या काहीही चुकीचं करत नाहीत” अशा कमेंट्स करत अमृता यांच्या चाहत्यांनी त्यांचं समर्थन केलं आहे.