लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून शाळेचे प्राचार्य कुर्माराव रेपाका यांच्या संकल्पनेतून यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम, आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रेरणेने, एम. डी. कदम व डॉ.अरुंधती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मराठी शब्दकोशांचे पूजन केले. त्यानंतर भाषासमृद्धीची प्रातिज्ञा घेण्यात आली. विनायक शिंदे व समीक्षा केंदळे हिने आपल्या भाषणातून मराठीची थोरवी व्यक्त केली. चैतन्य लोहार व योगीराज पाटील यांनी पसायदान म्हटले. रिया मोरे व अंजली शिंदे यांनी उत्कृष्ट कविता गायन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामुदायिक कविता गायन करून मराठी भाषेविषयी आत्मीयता दाखवली. ठळक बातम्यांसह वैयक्तिक व सामुदायिक कविता गायन, मुलांची भाषणे व पसायदानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास सर्वच मुलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमास रंगत वाढली. यामुळे विद्यार्थ्यांचे मातृभाषेप्रती प्रेम वृध्दिंगत झाले. अमुल्या राळेभात हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.