लोणी काळभोर, (पुणे) : बीएलओ, निरक्षर सर्वेक्षण, जनगणना या महिनोंमहिने चालणाऱ्या अशैक्षणिक कामांतून थोडा वेळ काढून आम्हाला आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवू द्या, अशी निर्णायक मागणी शिक्षकदिनीच लोणी काळभोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी शासनाकडे केली. या वेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
अशैक्षणिक कामांचा बोजा वाढल्याने, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. बीएलओ, निरक्षर सर्वेक्षण, जनगणना या अशैक्षणिक कामांबरोबरच केंद्र, राज्य ते अगदी शाळांस्तरावरचे वेगवेगळे उपक्रम राबवणे, त्याची माहिती विविध ॲपवर भरणे, शालेय अभिलेख अद्ययावत ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, आधार कार्ड जोडणे अशा भरमसाट कामांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही.
परिणामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत आहे. या दृष्टचक्राला शिक्षक वैतागले आहेत. त्यामुळे गावोगावच्या शिक्षकांनी आमचे अध्यापनाचे मूळ काम आम्हाला करू द्या. ”आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, त्यांचे भविष्य घडवू द्या…” अशी आर्त साद घातली आहे.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना लोणी काळभोर येथील एक प्राथमिक शिक्षक म्हणाले की, १७ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सर्व शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियानांतर्गत सर्व कुटुंबांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेशित करण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका घेणे व त्याचे इतिवृत्त लिहिणे, विनोबा अॅपवर सातत्याने माहिती भरणे, पाठ्यपुस्तक व गणवेश योजना राबविणे, यासारख्या शिक्षकांच्या विविध अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थी अध्यापनापासून दुरावत आहे.
मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला आहे. यामुळे अर्थातच प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच हवेली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रशासकीय, आर्थिक व इतर प्रश्न कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक कालावधीपासून प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, अशैक्षणिक कामांमुळे त्रस्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांची ‘आम्हाला शिकवू द्या’ ही शासनाकडे आग्रहाची मागणी आहे. अशैक्षणिक व अतिरिक्त कामांचा निषेध म्हणून आजच्या शिक्षक दिनी सर्व शिक्षक काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त करत, अध्यापनाचे काम करत आहेत. या निषेधाची नोंद घ्यावी, असे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर म्हणाले, “या अशैक्षणिक कामामुळे तसेच सतत ऑनलाईन माहिती भरल्यामुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षक हा दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे अध्ययन अध्यापनात सतत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या ऑनलाईन कामातून शिक्षकांना मुक्त केले पाहिजे.”
शिक्षकांच्या मागण्या..
– बी. एल. ओ कामे रद्द करा
– सतत येणारे उपक्रमास विरोध
– ऑनलाईन कामे बंद करा
– आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या
– शिक्षणसेवक भरती करा
– मुख्याध्यापक पदोन्नती करा
– गोरगरिबांची मुले शिकवू द्या