पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील रिक्त १११ प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी एकूण ६ हजार ५२० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठाकडून प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठात नवीन प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी डिसेंबर महिना उजाडणार असल्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठातील १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३० डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या मुदतीत ५ हजार ५८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, राज्य शासनाने मराठा आरक्षण लागू केल्यामुळे विद्यापीठाला आरक्षण बदलून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी लागली. राज्य शासनाकडून मान्यता घेऊन विद्यापीठाने २३ सप्टेंबर रोजी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली.
ज्या उमेदवारांनी पूर्वी अर्ज केले होते, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, मराठा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे पूर्वी अर्ज करू न शकलेल्या काही उमेदवारांनी अर्ज केले. त्यामुळे एकूण अर्जाची संख्या आता ६ हजार ५२० एवढी झाली आहे.
विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी प्राध्यापक पदासाठी ६०३, सहयोगी प्राध्यापक पदासाठी १ हजार ८१, तर सहायक प्राध्यापक पदासाठी ४ हजार ८३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज सहायक प्राध्यापक पदासाठी प्राप्त झाले आहेत.